Wednesday, 23 January 2019

6 वर्षानंतर भारतात परतलेल्या हमीदचा तरुणांना 'हा' सल्ला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

पाकिस्तानी कारागृहात 6 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर भारतात परतलेल्या हमीद अन्सारीने तरुणांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. फेसबुकवरुन प्रेमात पडू नका असे हमीद अन्सारीने तरुणांना सांगितले आहे. हमीद अन्सारी फेसबुकच्या माध्यमातूनच पाकिस्तानमधील एका तरुणीच्या प्रेमात पडला होता. या तरुणीसोबत त्याची भेटही झाली नसताना तिच्या मनाविरुद्ध होणारे लग्न थांबवण्यासाठी हमीद पाकिस्तानात गेला आणि त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर पुढील 6 वर्ष हमीद अन्सारीने पाकिस्तानच्या कारागृहात घालवली.

हमीद अन्सारी अखेर 6 वर्षांनी पुन्हा आपल्या घरी परतला आहे. मुंबईतील आपल्या घरी आपल्या कुटुंबीयांसोबत पुन्हा एकत्र आला आहे. ‘आपल्या आई-वडिलांपासून काहीच लपवू नका. जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा फक्त आई-वडील तुमच्या बाजूने उभे असतात. कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब अजिबात करु नका’, असे हमीदने सांगितले आहे.

यावेळी त्याला फेसबुकच्या माध्यमातून प्रेमात पडणाऱ्यांना काय सल्ला देशील असे विचारले असता त्याने सांगितले की, ‘ती जोखीम पत्करु नका. प्रेमात पडू नका. फेसबुकवर जे काही असते त्याच्यावर विश्वास ठेवत प्रेमात पडू नका’, असे हमीदने सांगितले. दिल्लीत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतल्यानंतर हमीद आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील वर्सोवा येथील घरी पोहोचला. हमीदच्या स्वागताची शेजाऱ्यांनी पूर्ण तयारी केली होती.

हमीदने आपली सुटका होईल याची कल्पनाही नव्हती असे सांगितले. ‘मंगळवारी सकाळी 6.30 वाजता कारागृह उप अधीक्षक आले आणि मला तुझी सुटका होत असून तयारी करण्यासाठी फक्त अर्धा तास असल्याचे सांगितले. मी प्रचंड आनंदात होतो. एकही क्षण वाया घालवायचा नाही असे ठरवले. कपडे बदलले, बूट घातले आणि मी गाडीत जाऊन बसलो. ताफा पूर्णपणे तयार होता’, असेही हमीद सांगत होता.

हमीद अन्सारीने फेसबुकवर मैत्री झालेल्या तरुणीला भेटण्यासाठी 2012 रोजी अफगाणिस्तानमधून पाकिस्तानात प्रवेश केला होता. त्यानंतर हमीदवर हेरगिरीचा आरोप लावत त्याला अटक करण्यात आली होती. अखेर 6 वर्षांनी त्याची सुटका करण्यात आली आणि वाघा-अटारी बॉर्डरवरुन भारताच्या हवाली करण्यात आले.


loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य