Tuesday, 11 December 2018

करुणानिधी- द्रविडीयन महानायकाचा अस्त...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मुथुवेल करुणानिधी... डोळ्यावर काळा चष्मा आणि व्हिलचेअरवर जखडलेला हा माणूस दक्षिण भारतातला सर्वांत पॉवरफूल राजकारणी होता. सात दशकापासून करुणानिधी या शब्दाला वगळून दक्षिण भारताच्या राजकारणाचा इतिहास तुम्ही लिहूच शकणार नाही. तामिळनाडूचे 5 वेळा मुख्यमंत्री, 6 दशकं आमदार, एकाचं पक्षाचं 50 वर्षे अध्यक्षपद भूषवलेले करुणानिधी हे राजकारण,समाजकारण आणि सिनेमा या सर्व क्षेत्रात छाप पाडणारे एक वेगळचं रसायन होते. त्यांच्या अंत्ययात्रेत उसळलेला जनसमुदाय बघून त्यांचे जनमानसातले स्थान लक्षात येईल. महत्वाचं म्हणजे केवळ राजकारण हीच करुणानिधी यांची ओळख नाही, तर समाजकारण, संस्कृती, भाषा, सिनेमा, पत्रकारिता या सर्व क्षेत्रात करुणानिधी यांनी आपल्या कार्याने अमीट छाप उमटवली आहे. 

करुणानिधी यांचा जन्म 1924मध्ये तिरुवर जिल्ह्यातल्या थिरूकुवलै या खेड्यात झाला. त्यावेळी तामिऴनाडूमध्ये ब्राम्हण्यविरोधी चळवळ जोरात सुरु होती. रामास्वामी पेरीयार यांच्या विचारधारेचा, चळवळीचा लहानग्या करुणानिधींवर प्रभाव होता. शिक्षण मध्येच सोडून करुणानिधी यांनी तामिळ चित्रपटांचे पटकथा लेखक, गीतकार म्हणून नाव कमावलं. 

वयाच्या 14व्या वर्षी करुणानिधी हिंदीविरोधी लढ्यात उतरले...आणि तिथून सुरु झाला करुणानिधी यांचा राजकीय प्रवास... बेधडक, बिनधास्त बोलण्याची शैली, संघटन कौशल्य, तामिळ संस्कृतीचा प्रचंड अभिमान,हिंदीविरोधी स्पष्ट भूमिका या गुणांमुळे करुणानिधी यांचा राजकीय प्रवास झपाट्याने पुढ गेला. १९५७ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून  आलेत.1962 मध्ये विरोधीपक्ष उपनेतेपद,त्यानंतर मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं. मात्र पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल 14 वर्षे त्यांना सत्तेबाहेर राहावं लागलं, मात्र त्याकाळात ते टिकून राहीले आणि त्यांनी कमबॅक केलं. राज्य एकहाती राखून केंद्रात प्रादेशिक पक्षांचा दबदबा निर्माण करण्याचं पहिले श्रेय करुणानिधी यांना जाते. या संघर्षाच्या काळात द्रमुक फुटला आणि अण्णाद्रमुक पक्ष अस्तित्वात आला. तामिऴनाडू राजकारणात दोन धृव निर्माण झाले. एक होत्या जयललिता आणि दुसरे करुणानिधी या दोघांमधील सूडाच्या राजकारणाचा थरार संपुर्ण देशाने अनुभवला.

करुणानिधी हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि त्याच काळात संपुर्ण राज्यात प्रचंड पायाभूत सुविधा उभारण्याचे काम झालं. राज्यभर रस्त्यांचं जाळं, पूल उभारण्यात आलेत. करुणानिधी यांच्या  दुरदृष्टीमुळे तामिऴनाडू राज्याचा औद्यौगिक पाया उभा राहिला. त्यामुळे तामिळनाडू हे औद्योगिक आणि प्रगत राज्य म्हणून पुढे आलं. दूसरी महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या सामाजिक जाणिवेमुळे तामिळनाडूने सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केलीये.समाजातील सर्व खालच्या थरातल्या समाजघटकांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना करुणानिधी सरकारने आणल्या आणि त्याची अमंलबजावणीही केली.द्रमुक पक्षातही ए राजा, टी एस बालू सारखे दलित नेते पुढं आलेत.

जयललिता, करुणानिधी यांच्यासारखे नेते काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे तामिऴनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नूकताचं राज्याच्या राजकारणात सुपरस्टार रजनिकांत आणि कमल हासन यांनी प्रवेश केलाय. याअगोदर जयललिता यांच्या निधनाने अण्णाद्रमुक सरकार आणि पक्ष कमकुवत झालाय. तर द्रमुकमध्ये नंबर टू असणारे स्टॅलिन राजकारणात तेवढासा प्रभाव दाखवू शकले नाही.त्यामुळे या परिस्थितीचा फायदा घेवून भाजप तामिळनाडूमध्ये शिरकाव करणार का ? की नेहमीप्रमाणे तामिऴनाडूचं राजकारण प्रादेशिक पक्षाभोवती फिरत राहणार याचे उत्तर लवकरच मिळेल.करुणानिधी यांच्या जाण्यामुळे द्रविडीयन संस्कृतीतल्या एका महानायकाचा अस्त झालाय. दक्षिण भारतात करुणानिधी यांची कमतरता कायम जाणवत राहील.  

विनोद राऊत
इनपूट हेड,जय महाराष्ट्र

loading...

Top 10 News

राशी भविष्य