Wednesday, 16 January 2019

Blog: शिक्षणाचं बाजारीकरण थांबवाच!

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

अरे!!! किती वेळा आठवण करुन देऊ? जा ना जरा चौकशी तरी कर. काल मी ४ फॉर्म आणले. ऑफिसला पोहोचायलाही उशीर झाला. जरा आज 'त्या' शाळेचा फॉर्म आण. शाळा चकाचक दिसतेय. लहान मुलं काय फाडफाड इंग्रजी बोलतात. आपल्यालाही जमतं पाहा. फी जरा जास्तच वाटतेय. पण ठिक आहे ना.. आपल्या पिल्लूसाठीच सर्व काही ना. माझ्या एका मैत्रिणीने काही मे महिन्यात मला कॉल केला. आणि नवऱ्यासोबत झालेला हा संवाद एका दमात सांगून टाकला.

 

याची आठवण आज यासाठी झाली कारण रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार. ७ वर्षाच्या प्रद्युम्न ठाकूरची झालेली हत्या. शिक्षण क्षेत्राची काळी बाजू.. खरं तर असं म्हणता कामा नये मात्र दुर्दैवानं म्हणावं लागतंय की ही काळी बाजू जगासमोर आली आहे. एक निरागस मूल. खेळण्या बागडण्याचं वय. गोंडस. नेहमीप्रमाणे शाळेत गेला. काही तासातच घरी फोन येतो आणि कळतं की आपलं मूल गेलं. आई बापाच्या पायाखालची वाळूच सरकली. काय घडलं तरी काय? काहीच उमजेना. इंटरनॅशनल स्कूल. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळतं पण सुरक्षेचं काय?

 

तळपायाची आग मस्तकात नेणारा प्रकार म्हणजे प्रद्युमन रक्ताच्या थारोळ्यात असताना त्याला अँम्ब्युलन्सने नव्हे, स्ट्रेचरवर तर मुळीच नव्हे तर एका चारचाकी वाहनात टाकून, हातात उचलून रुग्णालयात नेण्यात आलं. याचं सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर इंटरनॅशनल स्कूलमधला ढोंगीपणाच समोर आला. रायन स्कूलप्रमाणेच इतर काही खासगी संस्थांमध्येही धडकी भरवणारे प्रकार घडले आहेत. मुंबईतल्या अंधेरीत लैंगिक अत्याचाराचे प्रकार, पनवेल, खारघरमध्ये फी वेळेत भरली नाही म्हणून मुलांची, त्यांच्या पालकांची अब्रू काढून मुलांना घरी पाठवणं. अचानक वाढवलेल्या फीवाढीविरोधात आवाज उठवला तर मुलांना शाळेबाहेरच ठेवणं. लखनऊमधल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये तर हजेरी.. माफ करा प्रेझेंटीसाठी मुलगा उभा नाही राहिला म्हणून ३ मिनिटात ४० कानाखाली मारल्या गेल्या. फार जुन्या नाहीत गेल्या काही दिवसातल्या या घटना. हे सांगतेय कारण नाही तर तुम्हीच म्हणाल एखादी घटना घडली की पत्रकारांना जुने मुडदे उखडण्याची सवयच असते.

 

शाळांचा दर्जा का इतका घसरतोय? फी वाढीवर नियंत्रण का नाही? शाळेच्या गेटमध्ये आत जाताच विद्यार्थ्याच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची नाही? गलेलठ्ठ फी आकारली जाते. मनात येईल तेव्हा फी वाढ, प्रोजेक्टसाठी लागणारं सामान शाळेतूनच घेण्याची सक्ती, ४-४ युनिफॉर्म शाळेच्याच टेलरकडून शिवून घ्यायचे. दरवर्षी नवेच ४ युनिफॉर्म.. ही सक्ती करत असताना शाळेवर प्रशासनाकडून सुरक्षेची सक्ती का नाही? पालक या मुद्द्याकडे पाहात नाहीत का? की दुर्घटना घडल्यावरच गंभीरता कळते?

 

रायन स्कूलमध्ये घडलेल्या प्रकारानंतर हादराच बसला. जेव्हा एक एक मुद्दे समोर येऊ लागले. स्कूलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये संपूर्ण कुटुंब. ग्रेस पिंटो या भाजपच्या कार्यकर्त्या असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अविशा कुलकर्णींनी दिली. कर्नाटकातल्या पिंटोंनी मुंबई, दिल्ली काबीज केली. आज देशभरात १३०हून अधिक रायनच्या स्कूल आहेत. १८००० शिक्षकांचा स्टाफ. इंग्रजीसंदर्भातलं आपल्या देशवासियांचं खुळ(आपल्याकडे मातृभाषेपेक्षा इंग्रजीला वरचं स्थान दिलं जात असल्याने खुळ शब्द वापरला) लक्षात घेऊन या कुटुंबाने एक शिक्षणाचं उत्तम बिजनेस मॉडेल देशाला विकलं. हे शक्य कसं झालं? राजकीय संबंधांना विरोध नाही. असावेत ना. पण नियमानुसार. नियमांची पायमल्ली होत असेल, कुणाच्या जीवावर या संस्था उठत असतील तर अशा संस्थांना निष्पक्ष चौकशीनंतर टाळं ठोकणंच योग्य. जेणेकरुन दुसरी रायन स्कूल उभी राहू नये.

 

मात्र दुर्दैवाने आपल्याकडे तसं घडत नाही. सरकार नियम बनवतं. जाहीर करतं, जीआर काढतं आणि गप्प बसतं. ऑडीट कोण करणार? ज्या खासगी शाळांना मान्यता दिली जाते, दिली गेलीय त्यांचं वार्षिक ऑडीट का होत नाही? ही स्वायत्तता का ? की दिली गेलीय? मुंबई महापालिकेच्या शाळांचं दरवर्षी ऑडीट होतं. अगदी न चुकता. मग दूर खेडापाड्यातल्या, जिल्हा परिषद, आदिवासी आश्रमशाळांकडे दुर्लक्ष का? साधी शौचाला जाण्याची सोयही नाही. ही भयाण स्थिती आहे आजच्या शिक्षण व्यवस्थेची. पण वारंवार प्रश्न सतावतोय की फक्त सरकारच याला जबाबदार आहे का? माझ्या मैत्रिणीसारखी मानसिकता ९९% नागरिकांची आहे, बनत चाललीय़. मग दोष कुणाचा? संधीच्याच शोधात असलेल्या पिंटोसारख्यांचा, यंत्रणेचा की पालकांचा?

 

माझं शिक्षण मराठी शाळेत झालं पण माझ्या मुलानं इंग्रजीतूनच शिकलं पाहिजे हा अट्टाहास नडतोय. माझी ऐपत नाही पण माझ्या मुलानं फाडफाड इंग्रजी शिकवणाऱ्या शाळेत जाण्यासाठी मी वाट्टेल ते करेन हा हळवेपणा नडतोय. हुशारी, कर्तृत्व, समंजसपणा पुस्तकातून, वाचनातून येतो. ते मग वाचन अ ब क डचं असो की A B C Dचं. सध्या व्यक्त होत असलेल्या आक्रोशानंतर सर्वांना एकच विनंती. शाळा चार भिंतीतली असो वा ४-५ मजली आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी शाळेचं ब्रोशर पाहताना शिक्षकांचा शैक्षणिक दर्जा आणि सुरक्षा यंत्रणेत शाळा A+ आहे ना हे नक्की तपासा !

 

वृषाली यादव, अँकर, जय महाराष्ट्र

ट्विटर हँडल:  @VrushaliGYadav

मेल आयडी :   This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य