बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या ‘या’ रॅकेटचा पर्दाफाश!

रेल्वेमध्ये नोकरीचं अमिष दाखवून एखाद दोन नव्हे तर ४० ते ५० बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या तीन आरोपींना ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केलं आहे. विशेष म्हणजे आरोपी हा रेल्वेमधील ठेकेदारच होता. अटक केलेल्या आरोपींकडून २ पिस्तुलं, १ रिव्हॉल्वर, १८ जिवंत काडतुसं तसंच रेल्वेचे बनावट रबर शिक्के हस्तगत करण्यात आले आहेत.

कसा लागला सुगावा?

विनापरवाना बेकायदा अग्निशस्त्रं विकण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली.

त्यानुसार उपवन तलावाजवळ सापळा रचून त्यांनी आरोपी राकेश राजाराम साळुंखे याला अटक केली.

आरोपीच्या झडतीत सेंट्रल रेल्वेचे बनावट शिक्के आणि मशीनद्वारे लेटरहेड बनवून नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांची फसवणूक करण्यासाठी बनवलेली कॉल लेटर्स मिळाली.

राकेशने अंदाजे ४५ ते ५० इच्छुक उमेदवारांना नोकरीसाठी कॉल लेटर देऊन उमेदवाराकडून प्रत्येकी २ लाख रुपये घेतले असल्याची कबुली दिली.

या प्रकरणी अटक आरोपी राकेश हा रेल्वेचा ठेकेदार असून त्याच्यावर १५ ते २० लाख रुपयांचे कर्ज झाल्याचं त्याने सांगितलं. या कर्जाची परतफेड करण्यासाठी हा रॅकेट सुरु केल्याची कबुली त्याने दिली.

राकेश याने नितीन निवृत्ती पगारे याच्याकडून स्वसंरक्षणासाठी 1 पिस्तुल खरेदी केल्याची कबुली दिली.

नितीनकडून 1 पिस्तुल आणि 1 रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे. नितीन हा कल्याण डोंबिवलीतील बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविकेचा पती असल्याचंही सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *