मालेगाव बॉम्बस्फोट : 7 जणांवर आरोप निश्चित!

2008 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य आरोपीविरोधात मंगळवारी एनआयएकडून आरोप निश्चित करण्यात आले. साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहितसह अन्य 7 आरोपींविरोधात दहशतवादी कट आखणे, हत्या आणि अन्य आरोप ठेवण्यात आले आहेत.

आपल्या विरोधात आरोप निश्चित करण्याला स्थगिती देण्यासाठी कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य व्यक्तींनी दाखल केलेली याचिका मुंबई न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली होती. आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर आम्हाला जाणीवपूर्वक यामध्ये फसवलं जात असल्याचा आरोप साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतर आरोपींनी केला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान, हायकोर्टाने एनआयएचे वकील संदेश पाटील यांना पुढील सुनावणीपर्यंत कर्नल पुरोहित यांनी दिलेल्या एका अर्जाचे उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. 29 सप्टेंबर 2008 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील भिक्कू चौक येथील मशिदीजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते.

याप्रकरणी काही वर्षांपूर्वी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा व इतर सहा जणांना युएपीएच्या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. याप्रकरणी युएपीएच्या कलमांची वैधता तपासण्यासाठी कर्नल पुरोहित यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसंच या वैधतेच्या खटल्याच्या निकाल लागेपर्यंत एनआयए कोर्टातील सुनावणी थांबावी यासाठी पुरोहितांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण हायकोर्टाने ही याचिका फेटाळली होती.

आज एनआयए कोर्टात हा खटला उभा राहिला असून त्यांच्यावर आरोप निश्चिती झाली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे. “दहशतवादाला कोणताच रंग नसतो. त्यामुळे दहशतवादी कोणत्याही धर्माचे असो त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. तसंच ते जर दोषी असतील तर त्या सर्वांना शिक्षा व्हायलाच हवी” अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *