‘ते’ 87 लाख फोटो फेसबुकवरून गायब!

फेसबुकवर आपले विविध पोस्ट्स टाकताना त्यांच्यासोबत व्हिडिओ आणि फोटो अपलोड करण्याचीही मुभा असते. मात्र अनेकदा या फिचरचा गैरफायदा घेतला जातो. अनेक आक्षेपार्ह फोटो तसंच व्हिडिओ फेसबुकवर अपलोड करण्यात येतात. या गोष्टीचा फेसबुकने गांभीर्याने विचार केला आहे. त्यामुळे गेल्या 3 महिन्यांत फेसबुकने 87 लाख फोटो डिलीट केले आहेत.

न्यूडिटी, लहान मुलांवरील शारीरिक आणि मानसिक अत्याचार आणि सेक्श्युअल कंटेंट असणारे 87 लाख फोटो फेसबुकने गेल्या 3 महिन्यांत आपल्याकडील एका विशिष्ट सॉफ्टवेअरद्वारे डिलीट केले आहेत. या सॉफ्टवेअरमुळे युजरने टाकलेले अश्लील फोटो आपोआप फेसबुकवरून डिलीट होणार आहेत.

अनेकदा फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट्स केल्या जातात. या पोस्ट्स वायरल होतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरतो. वाद निर्माण होतात. याला आळा घालण्यासाठी फेसबुकने हे पहिलं पाऊल उचललंय.

इन्स्टाग्रामवरील फोटोही होणार डिलीट

केवळ फेसबुकवरीलच नव्हे, तर इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह फोटो डिलीट होणार आहेत. युजर्स अपलोड करत असलेल्या फोटोंमध्ये जर नग्नता, अश्लीलता, लहान मुलांवरील अत्याचार, शोषण यांची विचलित करणारी दृश्य असल्यास तसे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवरूनही डिलीट होणार आहेत.

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तरुणांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. सुमारे 2 अब्ज लोक फेसबुकवर आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या युजर्सचा डेटा पाहाणं फेसबुकला शक्य नसतं. त्यामुळे अनेकदा आक्षेपार्ह, वादग्रस्त पोस्ट अपलोड केल्यावर फेसबुकला त्याची कल्पना येत नाही. मात्र आता आपल्या नव्या विशिष्ट सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे फेसबुक आणि इन्स्टाग्रामने आसे वादग्रस्त आणि अश्लील फोटो डिलीट केले आहेत. एवढंच नव्हे, तर अशा पोस्ट तयार करणाऱ्यांची अकाऊंट्सही फेसबुकने ब्लॉक केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *